गाझियाबाद - येथील एका न्यायालयाने कौटुंबिक वादावर सुनावणी करताना पत्नीच्या रूममध्ये एसी लावून तिला दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले आहेत. तसेच कुटुंब कल्याण केंद्राच्या महिला कॉन्स्टेबलने दर आठवड्याला या महिलेच्या घरी जाऊन तिच्या खुशालीची चौकशी करून त्याची माहिती न्यायालयाला देण्याचे आदेशही न्यायालाने दिले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मानसी विहार येथे राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह 2013 साली एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या तरुणाशी झाला होता. मात्र लग्नाला काही वर्षे उलटूनही मुलबाळ न झाल्याने सदर तरुणीच वांझोटी ठरवून सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. तिला घराबाहेर काढून नोकरांच्या खोलीत ठेवले गेले. तसेच तिच्यावर घटस्फोटासाठीही दबाव आणला गेला. ही बाब समजल्यावर या तरुणीने न्यायालयात धाव घेतली. तसेच पोटगीचा खटला दाखल केला. तसेच आपल्या खोलीत एसी लावण्याची तसेच दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र सदर महिलेच्या पतीने या महिलेवरच आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे ऐकत नसल्याचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली होती. अखेर दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने पतीचा दावा फेटाळून लावला. तसेच सदर महिलेच्या रूममध्ये एसी लावण्याचे तसेच तिला दरमहा खर्चासाठी दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
पत्नीच्या रूममध्ये एसी लावण्याचे कोर्टाने पतीला दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 11:11 AM