नवी दिल्ली : ३७० कलम रद्द केल्यानंतर महिनाभरापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना काश्मीरमध्ये भेटण्यासाठी त्यांची मुलगी इल्तिजा हिला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली आहे.
श्रीनगरमध्ये घरी जाण्यास मला कोणतीही अडचण नाही; परंतु तिथे संचारस्वातंत्र्यावर बंधने आहेत असे इल्तिजाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले होते. त्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. चेन्नईत राहणाऱ्या इल्तिजाला श्रीनगरमध्ये आईची खासगी भेट घेण्यास परवानगी आहे. मात्र, अन्यत्र जाण्यासाठी तिने प्रशासनाची आधी परवानगी घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत असून, महिनाभरात त्यांच्याशी भेट झालेली नाही, असे इल्तिजाने म्हटले होते.
तारिगामी यांना एम्समध्ये हलवाकाश्मीरमध्ये स्थानबद्ध करण्यात आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद युसूफ तारिगामी यांना श्रीनगरमधून दिल्लीतील एम्स रुग्णालयात लगेच हलवावे, असा आदेशही न्या. गोगोई यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला दिला आहे.श्रीनगरच्या रुग्णालयातील डॉक्टर्स व एम्सच्या डॉक्टरांनी सल्लामसलत करून, तारिगामी यांना हलवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तारिगामी यांना ताब्यात घेण्यासंदर्भात औपचारिक आदेश जारी केला नसल्याचा युक्तिवाद सीताराम येचुरी यांच्यातर्फे करण्यातआला. त्यावर केंद्राला एका आठवड्यात उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले. (वृत्तसंस्था)