नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर रोजी होणारी नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) युजी परीक्षा लांबणीवर टाकण्यास सोमवारी नकार दिला. परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करावा, असे आम्हाला वाटत नाही व परीक्षेचे वेळापत्रक बदलणे ‘खूपच अनुचित’ ठरेल, असे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले. ‘विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा द्यायच्या असतील, तर त्यांनी प्राधान्यक्रम ठरवून निवड करण्याची गरज आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
याचिकाकर्ते सक्षम अधिकाऱ्यांकडे म्हणणे मांडण्यास स्वतंत्र आहेत व ते अधिकारी या विषयावर कायद्यानुसार लवकर निर्णय घेऊ शकतील, असे न्यायालयाने म्हटले. ‘याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील शोएब आलम जे म्हणत आहेत, ते ९९ टक्के उमेदवारांशी संबंधित असणार नाही. एक टक्का उमेदवारांसाठी व्यवस्था थांबवता येणार नाही,’ असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
काय होता युक्तिवाद ?n१२ सप्टेंबर ही इतर परीक्षांचीही तारीख असल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-युजी २०२१ लांबणीवर टाकावी, असा युक्तिवाद शोएब आलम यांनी केला होता. परीक्षा लांबणीवर टाकली, तर ती दुसऱ्या कोणत्या तरी परीक्षेच्या तारखेला येण्याची शक्यता असते, हेही लक्षात घ्यायला हवे. nसंबंधित मंडळे त्यांची त्यांची कामे करीत असून, न्यायालय या परिस्थितीत परीक्षांबद्दल हस्तक्षेप करणार नाही, असे खंडपीठाने म्हटले.