ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरनगर, दि. ११ - प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शाहांविरोधात उत्तरप्रदेश पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र स्वीकारण्यास मुझफ्फरनगर येथील कोर्टाने नकार दिला आहे. पोलिसांनी अमित शाह यांना अटक करण्याचे प्रयत्न न करता थेट आरोपपत्र दाखल केल्याचे सांगत कोर्टाने आरोपपत्र पोलिसांना परत केले आहे. कोर्टाने फटकारल्याने पोलिसांची नाचक्कीच झाली आहे.
एप्रिलमध्ये मुझफ्फरनगर येथील प्रचारादरम्यान अमित शाह यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी मतदान करा असे प्रक्षोभक विधान केले होते. याप्रकरणी बुधवारी उत्तरप्रदेश पोलिसांनी अमित शाह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र अवघ्या चोवीस तासातच हे आरोपपत्र मागे घेण्याची नामूष्की उत्तरप्रदेश पोलिसांवर ओढावली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुंदरलाल यांनी हे आरोपपत्र स्वीकारण्यास नकार दिला. उत्तरप्रदेश पोलिसांनी क्रिमिनल प्रॉसिजर कोडमधील कलम १७३ (२) चे पालन न करताच आरोपपत्र दाखल केला. या कलमानुसार पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. मात्र पोलिसांनी असे कोणतेच प्रयत्न केले नाही हे निदर्शनास आणून देत कोर्टाने आरोपपत्र पोलिसांना परत केले.