वाराणसी/नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीप्रकरणी काेणत्या खटल्यावर सर्वप्रथम सुनावणी करावी, याबाबत वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी मंगळवारपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवला. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयात न्या. ए. के. विश्वेश यांच्यासमाेर प्रकरणाची सुनावणी झाली. दाेन्ही पक्षकारांनी याप्रकरणी अनेक याचिका दाखल केल्या असून त्यापैकी नेमकी काेणत्या याचिकेवर सुरुवातीला सुनावणी करावी, याबाबत न्या. विश्वेश मंगळवारी निर्णय जाहीर करणार आहेत.
न्यायालयात सुमारे ४५ मिनिटे सुनावणी झाली. त्यावेळी हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भात युक्तिवाद केला. या प्रकरणात हा कायदा लागू हाेत नाही, असा दावा वकिलांनी केला. त्यासाठी त्यांनी १९३७ मधील दीन माेहम्मद खटल्याचा दाखला दिला. आयाेगाची कारवाई आधी झालेली आहे. आता मुस्लीम पक्षकारांनी त्यावर आक्षेप नाेंदवावेत, अशी भूमिकाही हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी घेतली; तर मुस्लीम पक्षाच्या वकिलांनीही बाजू मांडली. (वृत्तसंस्था)