पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारत येऊन लग्न करणाऱ्या सीमा हैदरच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरकडून दाखल करण्यात आलेली याचिका जिल्हा न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाने स्वीकारली आहे. न्यायालयाने सीमा हैदर आणि सचिन मीनासह लग्न लावून देणाऱ्या पंडितांना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 मे रोजी होणार आहे. पानिपतचे वकील मोमीन मलिक हे गुलाम हैदरचे वकील आहेत.
यासंदर्भात माहिती देताना वकील मोमीन मलिक म्हणाले, सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या नुकत्याच पार पडलेल्या लग्नाच्या वाढदिवसाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना पक्षकार करण्यात आले आहे. याशिवाय मुले दत्तक घेणे, धर्मांतरण आदी प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
एवढेच नाही तर, वकील मोमीन मलिक यांच्या म्हणण्यानुसार, सीमाला तिने धर्मांतर केव्हा केले हेही न्यायालयात सिद्ध करावे लागेल. याशिवाय अल्पवयीन मुलांचा धर्मही अशा प्रकारे बदलला जाऊ शकत नाही. ज्यांना समन्स बजावण्यात आले आहेत त्या सर्वांना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
11 माहिन्यापूर्वी पाकिस्तानातून भारतात आली सीमा -पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सीमा हैदर आणि रबुपुरा येथील सचिन मीना यांची प्रेमकहाणी गेल्या 11 महिन्यांपासून चर्चेत आहे. सचिन आणि सीमा PUBG खेळताना संपर्कात आले. यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मार्च 2023 मध्ये ते पहिल्यांदा नेपाळमध्ये भेटले. यानंर, सीमा तिच्या मुलांसह 4 मे 2023 रोजी नेपाळमार्गे पाकिस्तानमधून रबुपुरा येथे आली. तेव्हा तिला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर तिला जामीनही मिळाला. तेव्हापासून ती येथे सचिनसोबतच राहते. तिने सरकारकडे भारतीय नागरिकत्वाची मागणीही केली आहे.