AAP MP Sanjay Singh: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर ईडी कोठडी देण्यात आली होती. यानंतर आता संजय सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, संजय सिंह यांना न्यायालयासमोर हजर केले असताना, त्यांनी केलेल्या विधानावरून न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संजय सिंह यांना चांगलेच सुनावले असून, तंबी दिली आहे.
दिल्लीच्या मद्य धोरणात मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपावरून संजय सिंह यांना ईडीने ४ ऑक्टोबरला अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आली. शुक्रवारी संजय सिंह यांना न्यायालयात हजर केले असताना, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.
अदानींच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली होती, पण...
आठ दिवसांपासून ईडीच्या कोठडीत आहे. पण, एकाच व्यक्तीने २-३ तासच चौकशी केली. मला विचारले जाते की, तुम्ही तुमच्या आईला पैसे का दिले? कुणाला पैशांची मदत केली का? अशा प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात. ईडीने गांभीर्याने तपास करायला हवा होता. पण, ईडी हा एक मनोरंजनाचा भाग झाला आहे, असे खोचक भाष्य संजय सिंह यांनी केले. यानंतर संजय सिंह यांनी अदानी यांच्या नावाचा उल्लेख करत, अदानींच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण, त्याचा तपास झाला नाही, असे संजय सिंह यांनी सांगायला सुरुवात केली. यावर न्यायाधीश नागपाल चांगलेच संतापले.
पंतप्रधान मोदी आणि अदानींबाबत बोलू दिले जाणार नाही
याप्रकरणाचा येथे काहीही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्याबाबत येथे बोलू दिले जाणार नाही. तुमच्या प्रकरणाशी संबंधित बोलायचे असेल, तर बोलू शकता. पण, राजकीय भाष्य करता येणार नाही. तुम्हाला हेच करायचे असेल, तर इथे येण्याची गरज नाही. दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला हजर केले जाईल, या शब्दांत न्यायाधीशांनी संजय सिंह यांना खडसावले.