नवी दिल्ली - गोव्यातील एका बार आणि रेस्टॉरंटच्या मालकीवरून काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येवर गंभीर आरोप केले होते. त्याविरोधात स्मृती इराणी यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांना समन्स जारी केले आहे. तसेच स्मृती इराणी यांच्या कन्येविरोधात केलेल्या टीकाटिप्पण्या २४ तासांच्या आत सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. जर त्यांनी या पोस्ट हटवल्या नाहीत तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी त्या हटवाव्यात असे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुलीविरोधात केलेल्या गंभीर आरोपांनंतर स्मृती इराणी यांनी पवन खेरा यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तसेच २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.
या प्रकरणी निरीक्षण नोंदवताना न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी सांगितले की, प्राथमिक दृष्ट्या मला वाटते की, कुठलीही पडताळणी न करता स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर हे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्यांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोर्ट ट्विटर, युट्युब, फेसबूक, इन्स्टाग्रामवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लावण्यात आलेले आरोप हटवण्याचे आदेश देत आहे.
कोर्टाने सांगितले की, जर प्रतिवादींनी २४ तासांच्या आत दिलेल्या सूचनांचं पालन केलं नाही तर ट्विटर, फेसबूक आणि यूट्युबने स्वत: यासंदर्भातील माहिती हटवावी, काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या कन्येवर गोव्यात अवैधपणे बार चालवत असल्याचा आरोप केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी केली होती, त्यानंतर स्मृती इराणी यांनी कायदेशीर लढाईस सुरुवात केली आहे.
दरम्यान, कोर्टाच्या आदेशांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते .जयराम रमेश यांनी सांगितले की, मी आणि या प्रकरणाशी संबंधित काँग्रेसचे इतर नेते कोर्टासमोर सर्व पुरावे ठेवणार आहोत. तसेच केंद्रीय मंत्र्यांकडून या प्रकरणाला भरकटवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे.