ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 8 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालायाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना न्यायालयीन प्रक्रियेत जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह केला होता. हरियाणामध्ये मोदींच्या या सल्ल्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आर्थिक आयुक्त न्यायालय तीन भावांमधील संपत्तीवरुन सुरु असलेल्या वादात व्हाट्सअॅपवरुन समन्स पाठवणार आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक खेमका यांच्या नेतृत्वातील न्यायालयाने हा आदेश दिला आहे. व्हाट्सअॅपवरुन समन्स पाठवण्यात येणारी ही देशातील पहिलीच घटना असेल. आतापर्यंत समन्स पाठण्यासाठी ईमेल किंवा फॅक्सचा वापर केला जात होता. या निर्णयामुळे समन्स पाठण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि न्यायालयीन प्रक्रियेलाही वेग येईल.
अशोक खेमका यांनी महसूल कायद्याशी संबंधित हिसारच्या अनुरंग शाहपूर गावातील तीन भावांच्या एका वादात सुनावणी घेताना हा आदेश जारी केला आहे. सतबीर सिंह यांचा भाऊ रामदयाल आणि कृष्ण कुमार यांच्यासोबत गावातील संपत्तीवरुन वाद सुरु आहे.
आर्थिक आयुक्तांच्या न्यायालयाने दोन्ही भावांकडे याप्रकरणी विचारणा केली असता रामदयाल यांना समन्स मिळाला होता, मात्र कृष्ण कुमार काठमांडूला शिफ्ट झाले असल्याने त्यांना कोणताही समन्स मिळाला नसल्याची माहिती मिळाली. स्थानिक महसूल अधिका-याने सांगितलं की "आपण कृष्ण कुमारशी संपर्क साधला, मात्र आपला पत्ता देण्यास त्याने नकार दिला".
यानंतर अशोक खेमका यांनी आदेश जारी करताना म्हटलं की, "सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीचा ईमेल आयडी आणि फोन नंबर उपलब्ध असतोच". समन्सचा फोटो काढून कृष्ण कुमार यांना पाठवण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसंच व्हाट्सअॅप डिलिव्हरी रिपोर्टची प्रिंट आऊट काढून न्यायालयात पुरावा म्हणून सादर करावा असंही सांगितलं आहे.