चेन्नई : सालेम येथील मंदिरातील अनेक वर्षे आजारी असलेल्या आणि स्वत:हून उभेही राहता येत नसलेल्या राजेश्वरी या हत्तीणीला असह्य यातनांमधून मुक्तीसाठी दयामरण देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त परवानगी दिली. प्राण्यांच्या दयामरणाचा भारतातील हा बहुदा पहिलाच आदेश आहे.‘इंडियन सेंटर फॉर अॅनिमल राइट््स अॅण्ड एज्युकेशन’ या संघटनेचे संस्थापक एस. मुरलीधरन यांच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. अब्दुल कुद्दुस यांनी हा निकाल दिला. (वृत्तसंस्था)चारही पाय निकामी, शरीरावर खोल जखमा- राजेश्वरी ही सालेम येथील अरुलमिगु सुगणेश्वर मंदिरातील हत्तीण आहे. मागचा डावा पाय लुळा झाल्याने गेली १० वर्षे ती तीन पायांवरच उभी राहात होती. अतिभार पडून संधीवात झाल्याने तिचे बाकीचे तीन पायही अधू झाले. त्यानंतर राजेश्वरी एका कुशीला कलंडून पडून राहू लागली.तिच्या शरीरावर मोठ्या, खोल जखमा झाल्या व त्यात कीडे झाले. जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत सोंडेने घासही घेता येत नसल्याने तिचे खाणेपिणेही अलीकडच्या काळात बंद झाले.मध्यंतरी राजेश्वरीला उठून बसवून तिची कूस बदलण्यासाठी डॉक्टरांनी जेसीबीच्या साह्याने तिला उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु जेसीबीमधून ती उंचावरून खाली पडली आणि तिला आणखी दुखापत झाली.- औषधोपचारांनी राजेश्वरी बरी होणार नाही व अशा ्वस्तेत तिला जगविणे म्हणजे तिला अधिक यातना देणे ठरेल, असे प्रमाणपत्र जनावरांच्या डॉक्टरांनी दिले तर या हत्तीणीला दयामरण दिले जावे, असा आदेश न्यायालयाने दिला.
मंदिराच्या हत्तीणीला दयामरण देण्यास मुभा, न्यायालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 6:04 AM