देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता कोरोना विरोधी लसीकरणावर भर देत आहे. यासोबत केंद्र सरकारकडून दैनंदिन पातळीवर राज्य सरकारांना विविध नियम आणि दक्षता घेण्याबाबतचं मार्गदर्शन केलं जात आहे. यात भारत बायोटेकनं आता कोव्हॅक्सीन लसीबाबत एक मोठा दावा केला आहे. भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार कोव्हॅक्सीनचा बुस्टर डोस कोरोनाच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटला नष्ट करण्यास सक्षम आहे.
कोव्हॅक्सीनच्या बुस्टर डोसच्या चाचणीत डोस घेतलेल्यांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नसल्याचं कंपनीनं जाहीर केलं होतं. तसंच बुस्टर डोस दिर्घ काळापर्यंत कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटविरोधात सुरक्षा देतो असाही दावा करण्यात आला आहे.
बुस्टर डोस घेतलेल्यांमध्ये दोन डोसच्या तुलनेत ५ पट अधिक अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. "बुस्टर डोस घेतल्यानंतर लोकांमध्ये CD4 आणि CD8 पेशी वाढल्याचं दिसून आलं आहे. यामुळे कोरोना विषाणू विरोधात कोव्हॅक्सीन दिर्घकाळ सुरक्षा उपलब्ध करून देतं. चाचणीच्या दरम्यान साइड इफेक्ट देखील आढळून आलेले नाहीत", असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.