गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगाच्या नाकीनऊ आणले आहे. सुरुवातीला काहीच माहिती नसल्याने कोरोना व्हायरसने मोठी धास्ती निर्माण केली होती. यामुळे सर्व जगानेच लॉकडाऊनचे कधीही अनुभव नसलेले पाऊल उचलले होते. अनेकांचे हाल झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले. तशाही परिस्थितीत संसाराचा गाडा हाकताना लाखो कर्तेसवर्ते गमावले. अनेक कुटुंबे निराधार झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात जवळपास अडीच लाख लोकांचा मृत्यू झाला.
अशा या संकटाला तोंड देण्यासाठी जगभरातील कंपन्यांनी लस बनविण्याचे प्रयत्न सुरु केले. जगाचा तारणहार कोण बनणार याची स्पर्धा सुरु झाली. कोरोनाचे जन्मस्थान चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांनी लस बनविण्यास सुरुवात केली. तशीच लस भारतातील एक कंपनी बनवत होती. परंतू त्यांची लस बनविण्याची पद्धत वेगळी आणि महागडी होती. अखेर रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि भारताच्या या कंपनीची लस बनली, परंतू वर्चस्वाच्या लढाईत भारताच्या या कंपनीच्या लसीला जगाने नाकारले.
जगातील सर्वात महागडी लस असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्ह्रक्सिनकडे जगानेच नाही तर भारतीयांनीही पाठ फिरविली. ऑक्सफर्ड अॅस्ट्राझिनेकाने विकसित केलेली आणि सीरम उत्पादित करत असलेली लस कोव्हिशिल्डला लोक पसंती देऊ लागले. सरकारनेही हीच लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली. जागतिक संघटनेची मान्यता असल्याने परदेश प्रवासातही याच लसीला प्राधान्य देण्यात येत होते. परंतू भारत बायोटेकच्या लशीला जागतीक आरोग्य संघटनेची मान्यता मिळविण्यासाठी जवळपास दीड वर्ष संघर्ष करावा लागला. आज भारत बायोटेकने लहान मुले आणि वयस्करांसाठी ग्लोबल व्हॅक्सिन बनल्याचा दावा केला आहे. यामुळे आमचे लक्ष्य पूर्ण झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोरोनाविरोधात एक जागतीक लस निर्माण करण्यात कंपनीला यश आले आहे. याच्या लायसनसाठी सर्व उत्पादन विकासाला पूर्ण करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.