नवी दिल्ली – देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावं यासाठी देशभरात विविध अभियान घेतले जात आहेत. लसीचे डोस कमी पडू नये यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. याच दरम्यान भारत बायोटेकनं देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोव्हॅक्सिनचं उत्पादन २ कोटींनी वाढवणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याचसोबत लहान मुलांच्या लसीच्या चाचणीबद्दलही मोठी घोषणा केली आहे.
भारत बायोटेकनं सांगितले आहे की, कोव्हॅक्सिन(Covaxin) उत्पादन जवळपास २ कोटी डोस वाढवलं आहे. सध्या भारत बायोटेक साडेतीन कोटी डोसचं उत्पादन करतं. कोव्हॅक्सिनचं उत्पादन वाढल्यामुळे आता भारत बायोटेक साडे पाच कोटी डोस उत्पादन करणार आहे. त्याचसोबत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीकडून याबाबतही आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
कोरोना भारतातून संपुष्टात येणार की नाही? व्हॅक्सिन एक्सपर्टचा खळबळजनक दावा
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लहान मुलांवर त्याची चाचणी सुरु होती ती आता पूर्ण झालेली आहे. कंपनी लहान मुलांवरील चाचणीचे डेटा पुढील आठवड्यात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DGCI) यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. विशेष म्हणजे एक दिवसआधीच फायजर कंपनीने दावा केलाय की, फायजर लस ही ५ ते ११ वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी प्रभावी आहे. कंपनीने या वयोगाटातील मुलांच्या व्हॅक्सिन ट्रायल पूर्ण झाल्याची माहिती दिली. भारतात अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली नाही.
थोडा दिलासा, थोडी चिंता
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा सर्वच देशांत उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 22 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी (21 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 252 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,45,385 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,09,575 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,27,49,574 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशामध्ये एकूण 81,85,13,827 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.