नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे भारत सरकारही अलर्टवर आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. याच तपासणीत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 11 उप-प्रकार परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये आढळून आले आहेत. 24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान 19,227 आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 124 कोविड पॉझिटिव्ह आढळले.
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे नमुने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर घेण्यात आले. तपासणीत कोरोना बाधित आढळलेल्या 124 प्रवाशांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, 124 पॉझिटिव्ह बाधितांपैकी 40 च्या जीनोम सिक्वेन्सिंगचे निकाल आले आहेत. यापैकी, ओमायक्रॉनच्या XBB.1 सबस्ट्रेनचे जास्तीत जास्त 14 नमुने आढळले. तर, एकामध्ये BF.7.4.1 आढळला.
गुरुवारी देशात कोविड संसर्गामध्ये किंचित वाढ झाली. गेल्या 24 तासांत 188 नवीन रुग्ण आढळले, तर बुधवारी 174 नवीन रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणांसह, देशात आतापर्यंत एकूण 4,46,79,319 बाधित झाले आहेत. तर, सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या 2554 वर आली आहे. तर आतापर्यंत 5,30,710 जणांचा मृत्यू झाला आहे.