PM Modi on Coronavirus : "कोरोना विषाणू अजून गेलेला नाही आणि पुन्हा तो डोकं वर काढत आहे. महासाथीच्या विरोधात आपली लढाई सुरू ठेवा असा तो इशारा देत आहे. हा बहुरुपी विषाणू पुन्हा कधी डोकं वर काढेल हे कोणालाच माहित नाही," अशी वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जवळपास १८५ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि गे जनतेच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचं ते म्हणाले.
गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील मां उमिया धामच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. तसंच मां उमिया यांच्या भक्तांना रासायनिक खतांच्या विळख्यातून पृथ्वी मातेला वाचवण्याच्या उद्देशाने नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं.
"कोरोनाची महासाथ हे एक मोठं संकट होतं आणि हे संकट आता संपलं आहे असं आम्ही म्हणत नाही. हा एक विराम असू शकतो. परंतु हा विषाणू पुन्हा केव्हा डोकं वर काढेल हे सांगता येत नाही," असंही ते म्हणाले. हा एक बहुरुपी आजार आहे. याचा प्रसार थांबवण्यासाठी जवळपास १८५ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत. हे लोकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले.
"नैसर्गिक शेतीसाठी पुढे या"यावेळी पंतप्रधानांनी पृथ्वीला वाचवण्याची गरज असल्याचं सांगितलं. "गुजरातमधील प्रत्येक गावातील शेतकऱ्यानं नैसर्गिक शेतीसाठी पुढे आलं पाहिजे," असं ते यावेळी म्हणाले.