Coronavirus Case updates: देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीमुळे टेन्शन वाढवलं आहे. भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे १००७ नवे रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ०.२३ वर पोहोचला आहे. त्याचवेळी, कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११,०५८ वर पोहोचली आहे.
मृत्यूच्या आकड्यांबद्दल बोलायचे तर, २४ तासांत संसर्गामुळे २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतातील मृतांची एकूण संख्या ५,२१,७३६ वर गेली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ८१८ रुग्ण कोरोनाचे बरे झाले आहेत. बुधवारी देशात कोरोनाचे १,०८८ नवे रुग्ण आढळले होते. हा आकडा १२ एप्रिलच्या तुलनेत ३६.६ टक्क्यांनी जास्त होता. यापूर्वी मंगळवारी ७९६ रुग्ण दाखल झाले होते. बुधवारी २४ तासांत नोंद झालेल्या मृत्यूंची संख्याही वाढली होती. बुधवारी, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ०.२५% इतका होता, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट ०.२४ टक्के इतका होता.
एनसीआरमध्ये कोरोनाच्या विळख्यात मुलंदिल्लीसोबतच एनसीआरमध्येही कोरोनाचा आलेख उंचावताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे नोएडा, गाझियाबादमध्ये लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. गेल्या २४ तासांत गौतमबुद्ध नगरमध्ये ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या आकडेवारीनंतर गौतमबुद्ध नगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८,७८७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ४९० जणांचा मृत्यू झाला आहे.
२४ तासांत १५ लाख लोकांचं लसीकरणगेल्या २४ तासांत एकूण १५,०५,३३२ जणांचं कोरोना लसीकरण झालं आहे. तर देशात आतापर्यंत एकूण १,८६,०७,०६,४९९ जणांचं लसीकरण झालं आहे. गेल्या २४ तासांत ४,२९,३२३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात ७९.४९ कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.