नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत होता. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेली पाहायला मिळत होती. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सलग पाचव्या दिवशी 40 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट असल्याची माहिती मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41, 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 541 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्ण ठीक होण्याच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.36 टक्के आहे. कोरोनाचे हे वाढणारे आकडे भीतीदायक आहेत. केरळमधून गेल्या काही दिवसांत दररोज 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक असलेल्या राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ICMR चे डॉ. बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांहून अधिक आहे. तर 53 जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के आहे. या जिल्ह्यांमधील लोकांची निष्काळजीपणा हा घातक ठरू शकतो. पाच राज्यामध्ये 80.36 टक्के नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 49.3 टक्के केस या केरळमधील आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाबाबत आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक असून 3 पैकी एकाचा मृत्यू होईल असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांनी हा गंभीर इशारा दिला आहे. गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं सर्वात जास्त खतरनाक रुप आता समोर आलं आहे. येत्या काळात हा नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक होऊन तीन पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. सायंटिफिक एडव्हायझरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपोर्टनुसार, कोरोनाचा भविष्यात येणारा व्हेरिएंट MERS व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक असू शकतो. या व्हेरिअंटमुळे जगभरात मृत्यू दर जवळपास 35 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. या संशोधनात केलेल्या दाव्यानुसार, तीन पैकी एकाचा मृत्यू होणं अटळ आहे.