कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:07 PM2023-12-25T22:07:57+5:302023-12-25T22:08:46+5:30
कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने संक्रमिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
Covid-19 JN1 Cases: कोरोनाने पुन्हा देशात शिरकाव केला आहे. आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN.1 ने चिंता वाढवलीये. देशभारत सातत्याने या नवीन व्हेरियंटच्या रुग्णांची वाढ होत आहे. सोमवारी कर्नाटकात 34 नवीन रुग्णांची नोंद झाली, त तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तिकडे, केरळमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत एका दिवसात 115 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्या मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोनाच्या नवीन जेएन.1 व्हेरियंटचे 34 रुग्ण आढळले आहेत. यातील 20 रुग्ण एकट्या बंगळुरुमधील आहेत, तर चार मैसूरु, तीन मांड्या आणि एक-एक रामनगर, बंगळुरू ग्रामीण, कोडागु आणि चामराजा नगरात आहे. या नवीन JN.1 व्हेरिएंटमुळे तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
केरळबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत कोव्हिड-19 चे 115 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह राज्यातील कोविडच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,749 वर पोहोचली आहे. सुदैवाने राज्यात गेल्या 24 तासांत या विषाणूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
JN.1 सब-व्हेरियंट म्हणजे काय?
JN.1 सब-व्हिरेयंट पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात आढळला. हा ओमायक्रॉन BA.2.86 पासून तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला BA.2.86 मुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली होती. BA.2.86 मोठ्या प्रमाणावर पसरला नाही, परंतु तज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. तज्ञांचे मते, जागतिक स्तरावर केसेसमध्ये झालेली वाढ हे सूचित करते की, JN.1 मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांनादेखील सहजपणे संक्रमित करू शकतो.