कोरोनाची धास्ती! कर्नाटक सरकारकडून अलर्ट जारी, 'या' लोकांना मास्क अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:22 PM2023-12-18T17:22:24+5:302023-12-18T17:23:14+5:30
कर्नाटक सरकारने आता राज्यात मास्कबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी केरळमध्ये कोरोनाचे १११ नवीन रुग्ण आढळले. तर एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाचा हा नवा धोका पाहता केरळच्या शेजारील राज्य कर्नाटकानेही आपल्या राज्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कर्नाटक सरकारने आता राज्यात मास्कबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
कर्नाटक सरकारने ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. मात्र, सध्या सार्वजनिक ठिकाणी ये-जा करणाऱ्या लोकांवर कोणतेही बंधन नाही. राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य केले आहे. तसेच, आरोग्य विभाग लवकरच कोविड संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
कोरोना म्युटेशनवरून कोणीही काळजी करू नये, असेही आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. डॉ. रवी यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार आणि श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्यांसाठी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक खाटा, पीपीई किट, टेस्टिंग किट तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे, केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तरच सार्वजनिक ठिकाणी कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या अशी परिस्थिती नाही आणि कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले.