कोविड-19 व्हायरसचा संसर्ग भारतात पुन्हा वेगाने पसरू लागला आहे. याबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढील 10-12 दिवस कोरोना व्हायरसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचू शकतो, त्यानंतर तो कमी होईल. XBB.1.16 व्हेरिएंटला कोरोना प्रकरणांमध्ये आताच्या वाढीचे कारण सांगितले जात आहे, जे वेगळे लक्षण दर्शवत आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कोविड-19 ची प्रकरणे वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे आणि ते कमी राहण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की कोरोना प्रकरणांमध्ये सध्याची वाढ XBB.1.16 मुळे आहे जी ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट आहे. रुग्णालयात दाखल किंवा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
रुग्णांमध्ये दिसतंय 'हे' नवं लक्षण
मार्चच्या शेवटी WHO ने XBB.1.16 ला 'निरीक्षण अंतर्गत व्हेरिएंट' म्हणून घोषित केले आणि असे म्हटले की हे आतापर्यंतचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार आहे. या प्रकाराची लागण झालेल्या लोकांमध्ये खूप ताप आणि खोकला याशिवाय आणखी एक लक्षण दिसून येत आहे. यामध्ये रुग्णांना कंजंक्टिवाइटिसचा त्रास ज्याला सामान्यत: डोळे येणे असं म्हणतात.
हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालात नेब्रास्का मेडिसिनच्या ट्रुहलसेन आय इन्स्टिट्यूटच्या संशोधकांचा हवाला देऊन म्हटले आहे की संक्रमित लोकांच्या अश्रूंमध्ये एक व्हायरस आढळला आहे, ज्यामुळे कंजंक्टिवाइटिस होऊ शकतो. संस्थेच्या म्हणण्यानुसार, डोळे लाल होणे आणि पाणी येणे, सूज, वेदना किंवा जळजळ, खाज येणे यांचा समावेश आहे.
दिल्लीत धोक्याची घंटा
बुधवारी दिल्लीत कोरोना संसर्गाचे 1,149 नवीन रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत संसर्गाचे प्रमाण 23.8 टक्के होते, याचा अर्थ चाचणी केलेल्या प्रत्येक 100 लोकांपैकी 23 पेक्षा जास्त लोकांना कोविडची लागण झाल्याचे आढळून आले. विभागाच्या बुलेटिननुसार, या 24 तासांमध्ये राष्ट्रीय राजधानीत कोविड-19 च्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तथापि, रुग्णाच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कोविड-19 नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातही हजारांहून अधिक रुग्ण, 9 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोविड संसर्गाचे 1,115 नवीन रुग्ण आढळले आहेत. याचदरम्यान 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारने जारी केलेल्या ताज्या बुलेटिननुसार, राज्याची राजधानी मुंबईत 320 नवीन प्रकरणे आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. येथे पॉझिटिव्हिटी रेट 14.57% नोंदवला गेला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"