नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्या १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहेत. गृहमंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्सनुसार आता ५० टक्क्यांहून अधिक लोकांना सिनेमा हॉलमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्स देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालय सिनेमा हॉलसाठी नवीन एसओपी (SOP) जारी करेल. केंद्राच्या सूचनेनुसार सामाजिक व धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एसओपीनुसार परवानगी दिली जाईल. युवा कार्यवाह व क्रीडा मंत्रालय जलतरण तलावांबाबत प्रमाणित कार्यप्रणाली जारी करेल.
या व्यतिरिक्त नागरी विमान उड्डाण मंत्रालय आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून निर्णय घेईल. याचबरोबर, प्रवासी वाहतूक, विमान प्रवास, मेट्रो- रेल्वे, शाळा, उच्च शैक्षणिक संस्था, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, एंटरटेनमेंट पार्क, योग सेंटर आणि जिम इत्यादींसाठी वेळोवेळी अपडेटेड एसओपी दिले जातील. या एसओपीचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल.
याचबरोबर, राज्यात आणि एका राज्यात दुसर्या राज्यात प्रवास करण्यास कोणतेही बंधन नसेल. याशिवाय, ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना, इतर रोगांनी ग्रस्त असलेले लोक, गरोदर स्त्रिया, १० वर्षांखालील मुलांसाठी आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेनमेंट झोनचे काळजीपूर्वक सीमित करणे, सुरुच राहील. तसेच, या झोनमधील निर्धारित प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे.