बंगळुरू - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल 49,310 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण 63.45 टक्के आहे. कर्नाटकातील एका 100 वर्षीय आजीने कोरोनावर मात केली असून कोरोना किरकोळ आजार असल्याचं म्हटलंय.
कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मी रुग्णलयात दाखल होते. तेथे डॉक्टरांनी माझी चांगली देखभाल घेतली, तसेच मला दररोज सफरचंद, औषधं आणि इंजेक्शनही देण्यात आले. त्यामुळे, आता माझी तब्येत ठणठणीत असल्याचं या आजींनी म्हटलं. तसेच, कोरोना हा किरकोळ सर्दीचा आजार असल्याचंही हल्लाम्मा यांनी म्हटलंय. या आजीबाईंच्या मुलाला, सुनेला आणि नातवालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा मुलगा बँकेत नोकरी करत असून 3 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर, 16 जुलै रोजी हल्लम्मा यांना कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. मात्र, कोरोनावर मात करत, 22 जुलै रोजी आजीची कोविड टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजार 945 पर्यंत पोहोचली आहे. त्यामध्ये, 8 लाख 17 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 30,601 एवढी झाली आहे. सद्यस्थितीत देशात 4 लाख 40 हजार 135 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, आत्तापर्यंत 63.45 टक्के रुग्ण बरो होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.