नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने प्रवाशांसाठी नवी नियमावली काढली आहे. केंद्र सरकारने ज्या देशांना जोखीम असलेल्या श्रेणीत टाकलं आहे. त्या देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हे नियम लागू असतील. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना भारतात एअरपोर्टवर कोरोना चाचणी करावी लागणार आहे. जर हा प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्याचे सॅम्पल जीनोम टेस्टिंगसाठी पाठवले जातील. त्याचसोबत प्रोटोकॉलनुसार त्या प्रवाशाला आयसोलेट केले जाईल.
केंद्र आरोग्य मंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवाशांना कोविड नियमांचे पालन करावं लागेल. २२ जानेवारीपासून जोखीम श्रेणीतील देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आयसोलेशन सुविधा बंधनकारक नसेल. याआधी ७ जानेवारीला काढलेल्या परिपत्रकात केंद्राने या प्रवाशांना आयसोलेशनमध्ये राहावं लागेल असं सांगितले होते. त्याचसोबत या प्रवाशांवर लागू असलेले प्रोटोकॉल बंधनकारक असतील ज्यात कॉन्टेक्ट ट्रेसिंगही समाविष्ट होतं.
२२ जानेवारीपासून लागू होणार नवे नियम
कोरोना व्हायरसच्या नव्या नियमाची अंमलबजावणी २२ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरु होईल. याआधी ११ जानेवारीपासून नियम लागू होते. पूर्वीप्रमाणे नवी नियमावलीही पुढील आदेशापर्यंत लागू असेल. बदलत्या परिस्थितीला लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयात नियमावलीत बदल करेल असं सांगण्यात आले आहे.
१९ देश जोखीम श्रेणीच्या यादीत
सध्याच्या स्थितीत १९ देश जोखीम श्रेणीच्या यादीत आहेत त्यात ब्रिटनशिवाय युरोपीय देशांचा समावेश आहे. या सर्व देशांना एकाच श्रेणीत ठेवले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्स्वाना, चीन, घाना, मॉरिशियस, न्यूझीलँड, झिम्बॉम्बे, तंजानिया, हाँगकाँग, इस्त्राइल, कांगो, इथियोपिया, कजाकिस्तान, केनिया, नायजेरिया, ट्यूनिशिया, जाम्बिया यांचा समावेश आहे. मार्च २०२० मध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये देशात आंतरराष्ट्रीय सेवांवर निर्बंध आणले होते. मागील १५ डिसेंबरला हे निर्बंध हटवण्यात येणार होते. परंतु ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ते तसेच ठेवले. डीजीसीएनं आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील निर्बंध येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.