नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना लसीकरणाला जानेवारी महिन्यात प्रारंभ होण्याची, तसेच जनजीवन येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.ते म्हणाले की, कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारकडून डिसेंबरच्या अखेरीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. देशातील एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकांना कोरोना लस टोचून झाली की, जनतेमध्ये आत्मविश्वास वाढेल. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्व लोकांसाठी कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असेल व जनजीवनही सुरळीत होईल, अशी आशा वाटते.ऑक्सफर्ड विद्यापीठ-अॅस्ट्राझेनेका कंपनी संयुक्तरीत्या विकसित करत असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीत सीरम इन्स्टिट्यूटचाही महत्त्वाचा वाटा आहे. आपत्कालीन वापरासाठी अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मागविली आहे. एका केंद्रात दररोज १०० जणांना देणार लस १०० लोकांना देशभरात प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज कोरोना लस टोचली जाणार आहे. ज्या केंद्रावर पुरेशा सुविधा असतील, तिथे दररोज २०० लोकांना लस देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.
भारतात कोरोना लसीकरण केव्हापासून?; अदर पूनावालांचा महत्त्वाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 2:37 AM