नवी दिल्ली – १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. दुपारी ४ वाजल्यापासून कोविन अँपवर ही नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु सुरुवातीच्या काही मिनिटातच सर्वर डाऊन झाल्याचा मेसेज पाहायला मिळत होता. मात्र कुठल्याही प्रकारचा सर्वर डाऊन नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट करत ४ ते ७ या कालावधीत ८० लाख लोकांनी नोंदणी केल्याचा दावा केला आहे.
संध्याकाळी ४ च्या सुमारास कोविन, आरोग्य सेतू आणि उमंग अँपवरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर ७ पर्यंत ८० लाखापर्यंत लोकांनी नोंदणी केली आहे. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली. याबाबत नॅशनल हेल्स ऑथेरिटीचे सीईओ आर. एस शर्मा म्हणाले की, ३ तासात ८० लाखापर्यंत लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. प्रति सेकंद ५५ हजार लोक साईटवर होते. सिस्टमने अपेक्षेनुसार काम केले.
शनिवारी १ मे पासून देशात कोविड लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यात मोठ्या संख्येने १८ ते ४४ वयोगटातील नागरिक असल्याने प्रत्येक जण लस घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. त्यासाठी तुम्हाला https://www.cowin.gov.in/home यावर जाऊन "register/sign-in" पर्यायावर क्लिक करून पुढे नाव नोंदवू शकता. संध्याकाळी ४ वाजता कोविन सर्वर डाऊन झाल्याने अनेकांना अडचण झाली. कोविड सर्वर डाऊन झाल्याचे मेसेज पाहायला मिळाले. त्यानंतर काही काळातच ही वेबसाईट पुन्हा सुरू झाली.
१८ वर्षावरील लोकांना महाराष्ट्रात १ मे पासून लसीकरण नाही
१८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटाला १ मे पासून कोरोना लस मिळणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली.
टप्पे आखले जाणार?
१८ ते ४५ वर्षे वयोगटाचं लसीकरण करण्यासाठी लवकरच संपूर्ण नियोजन केलं जाईल. यासाठी १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ असे तीन गट करण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य द्यायचं का याबद्दलही विचार सुरू आहे. नागरिकांनी कोविन ऍपवर नोंदणी करून आणि अपॉईंटमेंट घेऊनच लस घेण्यासाठी केंद्रावर यावं. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहनही टोपेंनी केलं.