नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे भारतासमोर गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी झुंजत असलेल्या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आली आहे. लसनिर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्युटने भारतीयांना कोरोनावरील लस देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोनावरील लस भारतात सर्वप्रथम वितरीत करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचं सीरम इन्टिट्युटने याआधी सांगितलं आहे. त्यानंतर आता फायझर पाठोपाठ कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितल्याची माहिती मिळत आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लस "कोविशील्ड" (Covishield) च्या आपत्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. असा अर्ज करणारी ही स्वदेशी पहिली लस आहे. सीरम संस्थेला परवानगी मिळाली तर भारतातील ही पहिली स्वदेशी लस ठरू शकेल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांचं हित अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात दिली आहेत.
ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी
सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी सांगितले की, आमच्या कंपनीचे लक्ष्य अॅस्ट्राजेनेकाची लस सर्वात प्रथम भारतात उपलब्ध करून देण्याचे आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना पुरवठा करण्याचा विचार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीचे उत्पादन भारतात सुरू आहे.
"कोविशील्ड कोरोनाविरोधात अतिशय प्रभावी"
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरमने आपल्या अर्जात चार वैद्यकीय चाचण्यांचा डेटा कंपनीकडून एकत्रित करण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील दोन, ब्राझील, भारतातील चाचण्यांचा समावेश आहे. याआधारे कोविशील्ड कोरोनाविरोधात अतिशय प्रभावी असल्याचं समोर आलं आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच अदर पूनावाला यांनी याआधी आपण प्रथम आपल्या देशाची चिंता करावी, ही आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यानंतर कोवॅक्स फॅसिलिटीवर जावे. नंतर इतर तडजोडी आणि करारांची चर्चा करावी. त्यामुळे माझ्या प्राधान्य क्रमांमध्ये सर्वातप्रथम भारत आणि भारतातील जनता आहे असं सांगितलं आहे.
"पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत त्यांची कोरोनावरील लस बाजारात येणार"
आपली कोरोनावरील लस ही जगातील सर्वात स्वस्त, सुरक्षित आणि सक्षम लस असल्याचा दावा अॅस्ट्राजेनेकाने केला आहे. तसेच आपल्याकडे लसीचे स्वस्त उत्पादन आणि सक्षम वितरण करण्यासाठी आवश्यक ते धोरण तयार असल्याचेही अॅस्ट्राजेनेकाने म्हटले आहे. अदर पूनावाला यांच्या मतानुसार, पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत त्यांची कोरोनावरील लस बाजारात येणार आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे एक हजार रुपयांपर्यंत असेल. जर सरकारने मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची ऑर्डर दिली तर किंमत कमीसुद्धा होऊ शकते.