COVID Cases in Kolkata: पश्चिम बंगालमध्ये फ्रंटलाइन वर्कर्समध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वेगानं वाढत आहे. एकामागोमाग एक डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील (Calcutta National Medical College & Hospital) सुत्रांच्या माहितीनुसार गेल्या ७२ तासांत ८० डॉक्टर आणि ज्युनिअर डॉक्टर्स तसंच मेडिकल विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये चार सहाय्यक अधिक्षकांचा देखील समावेश आहे. एकूण मिळून कोरोना संक्रमितांचा आकडा १०० च्या वर पोहोचला आहे. वैद्यकिय विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर हॉस्टेल रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर बंगाल मेडिकल कॉलेजमधील २५ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाचं हॉस्टेल रिकामी करण्याचे आदेश याआधीच देण्यात आले आहेत.
रुग्णालयांमध्ये वेगानं संसर्गरुग्णालयांच्या हॉस्टेलमध्ये अनेक लोक एकत्र राहतात त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं होऊ शकतो. एका व्यक्तीला कोरनाचा संसर्ग झाला की त्याच्यामुळे इतर जणही धोक्यात येतात. हॉस्टेलमध्ये राहणारे डॉक्टर्स, कर्मचारी एकत्रच राहतात आणि कँटिनमध्ये जेवण करतात यामुळे अधिक धोका निर्माण होतो. या सर्वबाबी लक्षात घेता प्रशासनानं आता हॉस्टेल रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी संक्रमित होत असल्याचं प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.