करीमनगर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना चाचणी, उपचार, लसीकरण याबद्दल अद्यापही लोकांच्या मनात गैरसमज आहेत. हेच गैरसमज दूर करण्यासाठी तेलंगणातील एका सरपंचानं पुढाकार घेतला. मात्र हा पुढाकार त्यांना भलताच महागात पडला.
तेलंगणातील करीमनगर येथील व्यंकटरोपल्ली गावचे सरपंच जुवाजी शेखर कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गेले होते. गावात होत असलेल्या अँटिजन चाचणीत कोणीच सहभागी होत नसल्यानं शेखर यांनी पुढाकार घेतला. इतर ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करून घ्यावी यासाठी ते पुढे सरसावले. मात्र या कोरोना चाचणीमुळे शेखर अडचणीत आले.
शेखर कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर पोहोचले. आरोग्य कर्मचाऱ्यानं नमुना गोळा करण्यासाठी त्यांच्या नाकात स्वॅब स्टिक घातली. मात्र ती नाकातच मोडली गेली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वॅब स्टिक काढण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. अखेर शेखर यांना करीमनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे एंडोस्कोपीच्या माध्यमातून स्वॅब स्टिक काढण्यात आली. स्वॅब स्टिक तुटून शेखर यांच्या गळ्यात जाऊन अडकली. ती काढण्यासाठी एंडोस्कोपी करावी लागली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.