लहान बाळांनाही देता येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस; ऑक्टोबरपर्यंत विकसित होणार : सीरम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:14 PM2021-01-31T17:14:10+5:302021-01-31T17:18:32+5:30
तेजीनं चाचणी पूर्ण झाल्यास नोवोवॅक्स जूनपर्यंत उपलब्ध होणार
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या वापराला परवानगी दिली होती. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली होती. निरनिराळ्या टप्प्यांमध्ये हा लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्ट लाईन वर्कर्सना ही लस देण्यात येत आहे. दरम्यान, ही लस लहान मुलांना देण्यात येणार नसल्याचं स्पष्टीकरण यापूर्वी देण्यात आलं होतं. परंतु आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सीरम इन्स्टीट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लहान मुलांनाही कोरोनाची लस देता येणार असून सीरम ती लस विकसित करत आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियामधील एक्सिम ग्रुपचे अध्यक्ष पी.सी. नांबियार यांनी लहान मुलांना देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधात्मक लस या वर्षांच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर जन्मानंतर महिन्याभरातच ती लहान बाळांनाही देता येणार आहे.
सीरम इन्स्टीट्यूटकडून सध्या कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड या लसीचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे. नांबियार यांनी केरळ मधील एका कार्यक्रमात संबोधित करताना याबाबत माहिती दिली. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. येत्या काळात ही लस लहान मुलांना देण्यात येणार आहे. तसंच पुढे जाऊन जर कोणत्याही लहान मुलाला कोरोनाची लागण झाली तर त्याला औषधाच्या रूपात ही लस दिली जावी यापद्धतीनंच ती विकसित करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सीरम इन्स्टीट्यूट अजून चार कोविशिल्ड लसी विकसित करणार आहे आणि या सर्व या वर्षाच्या अखेरीस वापरासाठी तयार असतील, असंही नांबियार म्हणाले.
नोवोवॅक्स जूनपर्यंत उपलब्ध होणार
"जर लसीच्या वैद्यकीय चाचण्या वेगानं पूर्ण झाल्या तर जून महिन्यापर्यंत नोवोवॅक्स वापरासाठी उपलब्ध होईल. लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबर महिन्यापर्यंत तयार होणार आहे. तर कोडॅजेनिक्सच्या सहकार्यानं विकसित करण्यात येणाऱ्या COVI-VAC लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे," असंही नांबियार म्हणाले. केंद्र सरकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाची क्षमताही वाढवण्यात येणार असून ती एप्रिलपर्यंत २० कोटी डोस इतकी होईल. कोविशिल्ड ही लस कोणत्याही खास प्रकारावर आधारित नसून मलेरिया आधारित लस आहे. ही कोविडच्या सर्व स्ट्रेनवर काम करणारीदेखील आहे. या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. थोडी डोकेदुखी आणि ताप येणं ही सामान्य लक्षणं आहेत. जे या आजारातून बरे झाले आहेत त्यांनादेखील ही लस घेण्याची आवश्यकता आहे. कारण कोरोना विरोधातील रोगप्रतिकारक शक्ती ही काही काळच प्रभावी राहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सूचना पाळणं आवश्यक
"लोकांनी जरी लसीचा पहिला डोस घेतला तर त्यांना मास्क परिधान करणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी सुरूच ठेवाव्या लागतील. पहिल्या डोस नंतर २९ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. व्यक्तीच्या शरीरात दुसरा डोस दिल्याच्या २१ दिवसांनंतर अँटिबॉडिज तयार होतात. तोपर्यंत लस ही त्या व्यक्तीचा आवश्यक तो बचाव करू शकत नाही. तरीही लोकांनी मास्क आणि सॅनिटाझरसारख्या गोष्टींचा वापर सुरूच ठेवला पाहिजे," असंही नांबियार यांनी नमूद केलं.