नवी दिल्ली : अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड लसीच्या भारतातील आपत्कालीन वापराला केंद्र सरकार पुढच्या आठवड्यात मंजुरी देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोविशिल्ड लसीला मंजुरी देणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे.सीरम इन्स्टिट्यूटने या लसीच्या देशातील मानवी चाचण्यांचा तपशील औषध महानियंत्रकांना सादर केला आहे. कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला ब्रिटनच्या आधी भारत मंजुरी देईल, अशी चिन्हे आहेत. देशामध्ये फायझर इंडिया व भारत बायोटेक या दोन कंपन्यांनीही त्यांच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारतामध्ये जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही लसींनाही आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी मिळणार असल्याची चर्चा आहे.
नवा विषाणू फारसा धोकादायक नाही- ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूबाबत गंभीर धोक्याचा इशारा देण्याची सध्या तरी आवश्यकता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. - साथीच्या फैलावात असे नवे विषाणू तयार होणे हा नेहमीचा प्रकार आहे. आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा नवा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे आढळून आलेले नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
अंटार्क्टिकावरही झाली कोरोनाची बाधाआतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या अंटार्क्टिका खंडावरही आता ही साथ पोहोचली आहे. चिली देशाचे अंटार्क्टिकावर संशोधन केंद्र असून, तेथील २६ लष्करी सैनिक व १० कंत्राटदार कोरोनाबाधित झाले.
सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय रुग्ण ३ लाखांपेक्षा कमीदेशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी होती. बुधवारी कोरोनाचे २३,९५० नवे रुग्ण सापडले, तर २६,८९५ जण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ९६.६३ लाख आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २,८९,२४० तर एकूण रुग्णसंख्या १,००,९९,०६६ आहे. बुधवारी या संसर्गामुळे आणखी ३३३ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,४६,४४४ झाली. जगभरात कोरोनाचे ७ कोटी ८३ लाख रुग्ण असून, त्यातील ५ कोटी ५१ लाख रुग्ण बरे झाले. भारतामध्ये अमेरिकेपेक्षा कोरोना बळी, सक्रिय रुग्णांची संख्या कमी आहे. अमेरिकेत १ कोटी ८६ लाख कोरोना रुग्ण आहेत.