नवी दिल्ली : कोविशिल्ड लस कोरोनाच्या विविध प्रकारांविरुद्ध (सार्स-कोव्ह-२) कोव्हॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी आहे, असा दावा नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. या संशोधनाची मुद्रणपूर्व प्रत शुक्रवारी इंटरनेटवर पोस्ट करण्यात आली. तथापि, या अभ्यासाचे पुनरावलोकन करणे बाकी आहे. हा अभ्यास जून २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान करण्यात आला. १८-४५ वर्षे वयोगटातील ६९१ लोकांनी या संशोधनात भाग घेतला.
पुणे व बंगळुरूमध्ये एकूण ४ ठिकाणी हे संशोधन झाले. यात शहरी व ग्रामीण भागातील लोकांचा समावेश होता. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींनी कोरोनाची विषाणूंची लागण न झालेल्या म्हणजेच सेरोनेगेटिव्ह आणि लागण होऊन बरे झालेल्या म्हणजे सेरोपॉझिटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या लोकांत पुरेशा अँटिबॉडी (प्रतिपिंडे) निर्माण केल्याचे संशोधनात आढळले. कोविशिल्डचा डोस देण्यात आलेल्यांची प्रतिकारशक्ती जास्त आढळली.
भारतात कोरोनाचे २१४ नवे रुग्ण, चार मृत्यू
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१४ नवीन रुग्ण आढळले असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या किरकोळ वाढीसह २,५०९ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी कोरोना रुग्णांची ताजी आकडेवारी जारी केली.
एक्सबीबी.१.५ बाबत सतर्क राहण्याची गरज
भारतात एक्सबीबी.१.५ या उपप्रकाराचा एकूण सात जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे भारतातही परिस्थिती बिघडू शकते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत लोकांना सतर्क करत आरोग्य तज्ज्ञांनी आधीच सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.