काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 10:55 AM2018-11-12T10:55:35+5:302018-11-12T10:57:13+5:30
भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
भोपाळ - दीर्घकाळापासून मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने राज्यातील सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ या स्थानिक नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी झंझावाती प्रचार करत आहेत, तर भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपले वचन पत्र शनिवारी प्रसिद्ध केले असून, या वचनपत्रामधून गोशाळांची बांधणी, गोमय, गोमुत्र यांचे व्यावसायित स्तरावर उत्पादन आणि मृत गाईंच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याबाबत आश्वासने देण्यात आली आहेत.
मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत हिंदू मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आपल्या वचनपत्राला सौम्य हिंदुत्वाचा रंग दिला आहे. शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचनपत्रामध्ये चित्रकूट येथून सुरू होणाऱ्या राम पथ गमन मार्गाची राज्याच्या सीमेपर्यंत बांधणी करण्याचे आश्वासन वचनपत्रात देण्यात आले आहे. तसेच तसेच राज्याची जीवनदायिनी असलेल्या नर्मदा नदीच्या परिक्रमा मार्गावर 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहांची बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या वचनपत्रामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात गोरक्षणासाठी करण्यात आलेल्या विविध घोषणा होय. काँग्रेसने आपल्या वचनपत्रामधून ग्रामपंचायत स्तरावर गोशाळा उघडण्याचे आणि विशिष्ट्य भागात गोअभयारण्य तयार करण्याची घोषणा केली आहे. तसेच गोशाळेतील गोबर, खत, कंडा, गोमुत्र आणि अन्य वस्तूंचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या गाईंवर उपचार तसेच मृत गाईंवर अंत्यसंस्कार करण्याचेही आश्वासन काँग्रेसने या वचननाम्यातून दिले आहे.
दरम्यान, या वचननाम्यातून काँग्रेसने जरी सौम्य हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज्यात सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना वेसण घालण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. राज्यात सत्ता आल्यावर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे. सत्ता आल्यावर राज्यातील सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.