नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने १४ फेब्रुवारी हा दिवस 'काऊ हग डे' म्हणून साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. दरम्यान, याआधी पशु कल्याण मंडळाने एक मार्गदर्शक पत्रक जारी केले होते. त्या पत्रकानुसार गायप्रेमी नागरिकांनी १४ फेब्रुवारीला देशभर 'काऊ हग डे' साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यासोबत पशु कल्याण मंडळाने वैदिक परंपराचा दाखला देखील दिला होता. मात्र, या निर्णयानंतर लोकांनी सोशल मीडियावर जोरदार मीम्स बनवले होते. यानंतर वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने हस्तक्षेप करून हा आदेश मागे घेतला आहे. काही लोकांनी सोशल मीडियावर या निर्णयाच्या बाजूने युक्तिवाद केला होता. उदाहरणार्थ, कुत्रे आणि मांजरांना मिठी मारल्याने तणावातून आराम मिळतो. तसेच गाईला मिठी मारल्याने आराम मिळतो. त्याचवेळी लोकांना त्रास देण्यासाठी हे जाणूनबुजून केले जात असल्याचे काही लोकांनी सांगितले.
दरम्यान, पशु कल्याण मंडळाने जारी केलेल्या आवाहन पत्रकात गाय भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगण्यात आले होते. पशु संपत्ती आणि जैव विविधतेचे उदाहरण म्हणून गायीकडे पाहतो. गायीला कामधेनू आणि गौमाता म्हटले जाते. निसर्गाला आई प्रमाणं संवर्धित करण्याचे काम गाय करते. पाश्चिमात्य संस्कृतीमुळे वैदिक परंपरा मागे पडल्या आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपल्याला सांस्कृतिक आणि समृद्ध वारशाचा विसर पडल्याचे पशु कल्याण मंडळाने म्हटले होते.