वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील कारखियांव येथे गुजरातच्या बनासकांठा जिल्हा दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या बनास डेअरीची पायाभरणी केली. याच वेळी त्यांनी येथील जनतेला 2095 कोटी रुपयांच्या 27 विविध प्रकल्पांचीही भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सभेला संबोधित करताना 'गाय हा काही लोकांसाठी गुन्हा असू शकतो, पण आमच्यासाठी गाय ही माता आहे,' असे म्हटले आहे.
मोदी म्हणाले, "आपल्याकडे गाईसंदर्भात बोलणे म्हणजे काही लोकांना गुन्हा वाटतो. गाय हा काही लोकांसाठी गुन्हा असू शकतो, आमच्यासाठी गाय ही माता आहे, पूजनीय आहे. गाई-म्हशींची खिल्ली उडवणारे लोक हे विसरतात की, देशातील 8 कोटी कुटुंबांचा उदरनिर्वाह, अशाच पशुधनावर चालतो."
मोदी म्हणाले, आमचे डबल इंजिनचे सरकार प्रामाणिकपणे आणि संपूर्ण शक्तीनिशी शेतकरी आणि पशुपालकांच्या पाठीशी उभे आहे. आज येथे बनास काशी संकुलाची जी पायाभरणी करण्यात आली, ती सरकार आणि सहकाराच्या याच भागीदारीचे प्रमाण आहे.
यावेळी विरोधकांवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, " जेव्हा मी यूपीच्या विकासात डबल इंजिनच्या दुहेरी शक्तीवर बोललो तेव्हा काही लोकांना फारच त्रास होतो. हे असेच लोक आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशला केवळ जात, धर्म, पंथ, याच चष्म्यातून पाहिले. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' यांसारखे शब्दही त्यांच्या अभ्यासक्रमात, त्यांच्या डिक्शनरीत नाहीत. त्यांच्या अभ्यासक्रमात, त्यांच्या डिक्शनरीत आणि त्यांच्या विचारात केवळ माफियावाद, परिवारवाद आणि घरांवर-जमिनींवर बेकायदेशीर कब्जा करणेच आहे."
गेल्या दहा दिवसांत मोदी वाराणसीत दुसऱ्यांदा आले आहेत. यावेळी त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. यापूर्वी ते 13 डिसेंबरला येथे काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी आले होते.