ऑनलाइन लोकमत
अलवार, दि. 5 - गाईंची वाहतूक करणा-या पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला रस्त्याच्या शेजारी जबर मारहण करण्यात येत असल्याचं दिसत आहे. मारहाणीमुळे पीडित पेहलू खान यांचा दोन दिवसांनी मंगळवारी रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यांचे चार साथीदार सध्या रुग्णालयात भर्ती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे राज्याचे गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी मारहाण करणा-यांचं समर्थन केलं असून त्यांचा गोरक्षक म्हणून उल्लेख केला आहे. या घटनेसाठी त्यांनी पीडितांनाच जबाबदार धरलं आहे.
पेहलू खान हरियाणाचे रहिवासी आहेत. पशु मेळामधून त्यांना या गाईंना विकत घेतलं होतं. त्यांनी कागदपत्रं सादर करुनही त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतून बाहेर खेचून, पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्या पिक अप व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली.
#WATCH: 5 men beaten up & their vehicle vandalised by cow vigilantes in Rajasthan's Alwar; later 1 man succumbed to injuries (01.04.2017) pic.twitter.com/almfW9W954— ANI (@ANI_news) April 5, 2017
"दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. गाईंची तस्करी बेकायदेशीर आहे माहित असतानाही ते करत होते. गोरक्षकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सामील झालेल्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं", म्हणत गुलाब चंद कटारिया यांनी मारहाण करणा-यांना एका अर्थी पाठिंबाच देऊन टाकला. पाठिंबा देताना "अशाप्रकारे कायदा हातात घेणं चुकीचं असून पोलीस कारवाई करतील", असंही ते बोलले आहेत.
पोलिसांनी कारवाई केली असून 10 जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. "आम्हाला काही लोक जयपूरहून गाईंची तस्करी करत असून दिल्लीला जात असल्याची माहिती मिळाली होती. बेहरोड पोलिसांनी काही ट्रक पकडले तर काही पळून जाण्यात यशस्वी ठरले. हे ट्रक लोकांनी जबरदस्ती थांबवले आणि वाहनचालकांना मारहाण केली", अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी पारस जैन यांनी दिली आहे.