ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी गायीच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा भाजपाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाच्या गो-प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "भाजपा ठिकाण पाहून गायीच्या मुद्यावर आपली भूमिका बदलते", असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.
तर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कत्तलखान्यांवर घातलेल्या बंदी निर्णयावर टीकास्त्र सोडत
"उत्तर प्रदेशात भाजपासाठी गाय मम्मी आहे तर ईशान्यकडे यमी आहे", असं वादग्रस्त विधानही ओवेसी यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांवर करण्यात आलेल्या बंदीच्या कारवाईमुळे लाखो लोकांचा रोजगार संकटात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय, ओवेसी यांनी कत्तलखान्यांवरील बंदीचा मुद्दा नुकताच संसदेतही मांडला होता. "भारतात म्हशीचं मांस निर्यात केल्यानंतर 26 हजार कोटी रुपये कमावले जातात. यातील 11 हजार कोटी रुपयांचा हिस्सा हा उत्तर प्रदेशाचा आहे", असे ओवेसी यांनी सांगितले.
दरम्यान, "आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता असूनही तेथे गोहत्येवर बंदी नाही. तेथील कत्तलखान्यांवरही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपाचा हा ढोंगीपण नाही का?, असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
पुढच्या वर्षी ईशान्येतील मिझोरामसह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सत्ता आल्यास गोहत्या बंदी करणार नाही, असं मिझोरामचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जेवी हुमा यांनी सांगितले. ईशान्य भारतात ख्रिश्चनांची संख्या अधिक आहे. यामुळे ईशान्येतील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बीफ खाल्ले जाते. या पार्श्वभूमीवर भाजपाने तेथे गोहत्या बंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
BJP"s hypocrisy is that in Uttar Pradesh Cow is mummy but in the Northeast its yummy: Asaduddin Owaisi pic.twitter.com/5AKsYag6j4— ANI (@ANI_news) April 1, 2017