गुवाहाटी: राज्य सरकार गायींच्या सुरक्षेसाठी संविधानाच्या चौकटीत राहून आवश्यक पावलं उचलेल, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सत्ता राखली. यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री सर्मा यांनी गोसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. तत्पूर्वी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांच्या भाषणात गोसुरक्षेची गरज व्यक्त केली.गाय आमची आमची माता आहे. आम्ही पश्चिम बंगालहून गायींची तस्करी होऊ देणार नाही. जिथे गायींची पूजा केली जाते, तिथे गोमासाचं सेवन व्हायला नको, असं आसामचे मुख्यमंत्री सर्मा म्हणाले. 'गोसंरक्षण व्हावं ही आमची भूमिका आहे. मात्र याचा अर्थ सगळ्यांनी त्यांच्या सवयी अचानक बदलाव्यात असं अजिबात नाही. फॅन्सी बाजार, शांतीपूर, गांधीवस्ती या गुवाहाटीतील ठिकाणी मदिना हॉटेलची (जिथे गोमांस मिळतं ती हॉटेल्स) गरज नाही. कारण इथले लोक याबद्दल संवेदनशील आहेत,' असं सर्मा म्हणाले.'ज्या भागात गोमांसाबद्दल संवेदनशीलता नाही, तिथे बदल करण्याची आवश्यकता नाही. आपली घटनादेखील गोहत्येच्या विरोधात आहे. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून त्यानुसार गोहत्या रोखायला हव्यात. राज्यातील गायींचा अवैध व्यापार रोखायला हवा,' असं मत सर्मा यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला पक्षाच्या बहुतांश आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.
गाय आमची माता, तिच्या सुरक्षेसाठी गोसुरक्षा विधेयक आणणार- आसामचे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 3:32 PM