नवी दिल्ली : २०२२-२३ या कालावधीत राष्ट्रीय पक्षांना मिळालेला ५९.५७% निधी हा अज्ञात स्रोतांकडून मिळाला असून, यात निवडणूक रोख्यांचाही समावेश आहे. यात माकपला ५७.७ कोटी रुपयांची देणगी स्वयंस्फूर्तीने मिळाली आहे. रोख्यांमधून ५७.७ कोटी रुपये मिळाल्याचे वृत्त यापूर्वी छापून आले होते. मात्र, ते माकपला स्वयंस्फूर्तीने देणगीतून मिळाल्याचे आकडेवारी सांगते.
रोख्यांच्या माध्यमातून निवडणूक निधी घेणार नसल्याची भूमिका आतापर्यंत माकपची राहिली असून, रोख्यांना विरोध करण्यासाठी माकपने बँक खातेही उघडलेले नाही, असे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे. रोख्यांबद्दल माहिती उघड न केल्याबद्दल माकपने एसबीआय विरुद्ध अवमान याचिका दाखल केली होती.