मुंबई - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वेसेवा विस्कळीत झालेली आहे. काही विशेष आणि नियमित गाड्या चालवण्यात येत असल्या तरी देशातील रेल्वे वाहतूक अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे रेल्वेचे आगावू आरक्षण करणाऱ्यांची तिकिटे रद्द झाली आहेत. आता या रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा कसा मिळवायचा याची चिंता प्रवाशांना लागलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ट्रेन रद्द झाल्याने रद्द करण्यात आलेल्या आरक्षित तिकिटांच्या परताव्याबाबत मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने रद्द झालेल्या तिकिटांच्या परताव्याबाबत या घोषणेतून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता रद्द झालेल्या तिकीटांचा परतावा मिळवण्यासाठी ३० जून नाही, तर प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रद्द झालेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी मध्य रेल्वेने लॉकडाऊनदरम्यान रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटांच्या रकमेचा परतावा ३० जूनपर्यंत मिळवता येईल, असे ट्विट केले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात लाखो तिकीट रद्द झालेली असल्याने परतावा मिळवण्यासाठी तिकी खिडक्यांवर गर्दी होत होती.
तिकीट खिडक्यांवर होत असलेल्या गर्दीमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत होते. तसेच गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या तिकीटांचा परतावा प्रवासाच्या तारखेपासून पुढच्या सहा महिन्यांमध्ये मिळवता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.