बंगळुरू : माझे आघाडीचे सरकार अस्थिर करून पाडण्याच्या उचापती काही लोक करत आहेत. पण त्यामुळे मी बिलकूल डगमगणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. पुन्हा मुख्यमंत्री व्हायची माझी तयारी आहे, असे विधान माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावणे सुरु झाले. आपल्या विधानाने पराचा कावळा केला जाऊ शकतो याचे भान ठेवत सिद्धरामय्या यांनी असा खुलासाही केला की, पाच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत जनतेने कौल दिला तर मुख्यमंत्री व्हायला मी तयार आहे, असे मला म्हणायचे होते.
पत्रकारांशी रविवारी बोलताना सिद्धरामय्या यांचे नाव न घेता मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले की, कोणीतरी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे व नव्या मुख्यमंत्र्याचा ३ सप्टेंबर रोजी शपथविधी होईल, असे भाकित भाजपावाले करीत असल्याच्या बातम्या माध्यमात पाहिल्या. नक्कीच माझे सरकार अस्थिर करण्याच्या उचापती कोणीतरी करीत आहे. पण त्यात त्यांना अजिबात यश येणार नाही. लवकरच माझे सरकार १०० दिवस पूर्ण करेल. खुर्चीची काळजी न करता मी राज्याला सुशासन देण्याचे काम सुरुच ठेवेन. सिद्धरामय्या यांचे कट्टर विरोधक व जनता दल (सेक्युलर) अध्यक्ष ए.एच. विश्वनाथ म्हैसूरमध्ये बोलताना उपरोधाने म्हणाले की, सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंद होईल. पण कोणत्या पक्षातर्फे किंवा कोणाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री होणार हे त्यांनी स्पष्ट केले तर बरे होईल! (वृत्तसंस्था)भाजपाच्या आवया सुरूचबाहेरून टेकू दिलेले कुमारस्वामींचे सरकार लवकरच कोसळेल, अशा माध्यमांतून पद्धतशीर आवया उठविणे भाजपाकडून सुरू आहे. भाजपाच्या एका नेत्याने तर असा दावा केला की, कुमारस्वामी सरकारमधून आमदारांना फोडण्याचे आमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला त्यांचे किमान १७ आमदार फोडावे लागतील.