भिंतीला अन् मनालाही तडे; जोशीमठातील पाडकाम सुरू असलेल्या कुटुंबांना भविष्याची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:35 AM2023-01-13T07:35:24+5:302023-01-13T07:35:34+5:30
जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.
चामोली/हैद्राबाद/नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरे खचल्याने येथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून, आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. येथील लोकांना आपले घर काढून घेतल्याचे दु:ख असून, भविष्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर आहे. जोशीमठ भागातील केवळ २५ टक्के घरांना भेगा पडल्याचा दावा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला आहे.
दरम्यान वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) व राष्ट्रीय भू-भौतिक संशोधन संस्थेतील (एनजीआरआय) तज्ज्ञांचे एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तेथील भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी (सबसर्फेस मॅपिंग) करणार आहे.
पुनर्वसन सुरू
जोशीमठमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे उत्तराखंड सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. या परिसरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले असून, पुनर्वसन पॅकेजही तयार केले जात आहे, अशी माहिती मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाला देण्यात आली.
कर्णप्रयाग, लंढौरसह अनेक ठिकाणीही संकट
जोशीमठमधील संकटाने अनेक वर्षांपासून भूस्खलनाच्या धोक्याला सामोरे जात असलेल्या उत्तराखंडमधील अन्य शहरांचा मुद्दा ऐरणीवर आला. कर्णप्रयाग व लंढौर या तीर्थक्षेत्रांसह अनेक ठिकाणे या संकटाला तोंड देत आहेत. कर्णप्रयागमधील बहुगुणा नगर येथे २०१५ पासून घरांना भेगा पडत आहेत. गोपेश्वरमधील चमोली जिल्हा मुख्यालयाचा काही भाग व गुप्तकाशीजवळील सेमी गाव अशाच परिस्थितीला तोंड देत आहे. मसुरीतील लंढौर व ऋषिकेशजवळील अटाली गावातही घरांना तडे जात आहेत. सिंगतली, लोडसी, कौडियाळा आणि बावनी या गावांतही घरांना तडे जाण्याचे प्रकार समोर आले आहेत.
संपूर्ण शहर धसण्याची शक्यता
इस्रोने उपग्रहाद्वारे जोशीमठ आपत्तीचा आढावा घेतला. तेव्हा भयावह चित्र समोर आले. उपग्रहाने दाखवलेल्या स्थितीनुसार संपूर्ण जोशीमठ शहर धसू शकते. उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यात लष्कराचे हेलिपॅड व नरसिंह मंदिर असलेल्या भागाखाली पाणी निचरा प्रणाली (मानवनिर्मित वा नैसर्गिक) असल्याचे समोर आले. पाण्यामुळे तेथील जमीन पोकळ झालेली असू शकते. विशेष म्हणजे याच भागावर शहर वसलेले आहे.
१९ सदस्यीय समिती
प्रत्येक बाधित कुटुंबाला १.५० लाख रुपयांची अंतरिम मदत वाटप व कोणत्या दराने भरपाई द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी हिमांशू खुराना यांच्या अध्यक्षतेखाली १९ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
बाधितांना बाजार दराप्रमाणे भरपाई देऊ
जोशीमठमधील बाधित कुटुंबांना भरपाई देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती बाधितांचे हित लक्षात घेऊन बाजार दर ठरवेल.
- पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड