बंगळुरू - कोई भी धंदा छोटा या बडा नही होता, और धंदे से बडा कोई धर्म नही होता... शाहरुखच्या चित्रपटातील हा डायलॉग चांगलाच फेमस झाला. त्यानंतर, अनेक उद्योग क्षेत्रातील सेमिनार आणि प्रेरणादायी वाक्यांमध्ये या डायलॉग फिक्स झाला. मात्र, बंगळुरुतील एका खारीमुरी विकणाऱ्या गाडी चालकाने हा डायलॉग खरा करुन दाखवलाय. त्यामुळेच, सोशल मीडियावर हा खारीमुरी विकणाऱ्या विक्रेत्याचं आणि त्याने दिलेल्या संदेशाचं कौतुक होत आहे. स्ट्रीड वेंडरच्या या सेल्समनशीपच्या कलेनं हॉकर्समधील वेगळाच गुण समोर आला आहे.
सोशल मीडियातून या खारे शेंगदाणे विकणाऱ्या या विक्रेत्याचा फोटो @vishnubogi नावाच्या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. फोटोत दिसणाऱ्या खारे शेंगदाणे विकणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्टॉलवर दोन पोस्टर चिकटवले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही पोस्टर्स इंग्रजीतील आशयाचे आहेत. त्यामुळेच, साहजिकच रस्त्यावरुन जाणारे लोकं त्याकडे आवर्जून आणि कुतुहलाने पाहतात.
पहिल्या पोस्टरमध्ये बिझनेस गुरू वॉरेन बफेचा एक कोट देण्यात आला आहे. नियम १ - कधीच गिऱ्हाईक गमावू नका आणि नियम २ - नियम नंबर१ कधीच विसरू नका. असा आशय एका फलकावर लिहिला आहे. रस्त्यावर खारे शेंगदाणे विकणाऱ्या एका विक्रेत्याने अशा प्रकारचा संदेश दिल्याने लोकांना आश्चर्य आणि कुतूहल वाटत आहे. तसेच, हा विक्रेता केवळ आपल्या धंद्यावर प्रेम करत नसून तो धंद्याप्रती इमानदारही आहे, असेही यावरुन दिसते.
दुसऱ्या पोस्टरवर त्याने खारे शेंगदाने खाण्याचे फायदे लिहिले आहेत. त्यामुळे, शेंगदाने खाल्ल्याने शरिराला होणारा लाभ सहज आणि लक्षवेधी स्वरुपात समाजावून सांगितला आहे. आपल्या प्रकृती आणि स्वास्थबाबत जे लोक नेहमीच जागरुक असतात, त्यांना यावरुन चांगली माहिती मिळत आहे. कारण, या पोस्टरवर शेंगदाने खाल्ल्यामुळे, शरीरातील पोषण मूल्य, विटामिन व जीवनसत्त्वे यांच्यावर होणारा फायदा सांगण्यात आला आहे. दरम्यान, ह्या शेंगा विक्रेत्याची ही भन्नाट आयडिया आणि त्याच्या उद्योगाबद्दलचं त्याचं प्रेम नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.