पुणे: अमेरिकन जिऑलॉजिकल सर्वे, नासा आणि ल्यूनर प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट यांनी गेल्या पन्नास वर्षांतील विविध चांद्रयान मोहिमेतून प्राप्त झालेल्या माहितीच्याआधारे चंद्राचा डिजिटल मॅप तयार केला आहे. त्याचा उपयोग पुढील चांद्रयान मोहिमा यशस्वी करण्यासाठी होणार आहे. अमेरिकेततर्फे येत्या २०२४ चंद्रावर माणूस पाठविला जाणार असून या मोहिमेसाठी सुद्धा यामुळे आपला चांगलाच उपयोग करता येणार आहे, असे खगोल अभ्यासक डॉ. प्रकाश तुपे यांनी सांगितले.मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. सहा अपोलो मोहिमा, अमेरिकेचा एल आरओ टॉपोग्राफी अभ्यास , जपानची कायुगा मोहीम अशा चंद्रावरील विविध मोहिमांतमधून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हा डिजिटल मॅप तयार करण्यात आला आहे. दहा वर्षांपासून मॅप तयार करण्याचे काम सुरू होते. येत्या ५१ व्या ल्यूनर प्लॅनेटरी सायन्स काँग्रेस मध्ये चंद्राच्या डिजिटल मॅप ची माहिती दाखविली राहणार आहे, असे अमेरिकन जिऑलॉजिकल सवेर्चे संचालक जीम रॅली यांनी नुकतेच सांगितले.तुपे म्हणाले,चंद्राच्या डिजिटल मॅपमध्ये चंद्राच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी विविध रंग वापरण्यात आले आहेत.त्यावरून चंद्राच्या जन्माच्यावेळी त्यावर असणारी माती आणि नंतरच्या कालावधीमध्ये बदलत गेलेले चंद्राचे स्वरूप याबाबतची माहिती विविध रंगांच्या आधारे डिजिटल मॅप मध्ये दिली आहे. या डिजिटल मॅपच्या माध्यमातून चंद्रावर कोणत्या ठिकाणी उतरावे, चंद्रावरील कोणत्या ठिकाणी कोणता धातू सापडू शकतो हे समजू शकणार आहे. त्यामुळे पुढील चांद्रयान मोहिमा राबविण्यासाठी हा डिजिटल मॅप उपयुक्त ठरणार आहे. चंद्रावर पाऊस, वारा अशा कुठल्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे सध्या तयार करण्यात आलेला मॅप हा कायमस्वरूपी वापरला जाणार आहे. भारताला सुद्धा या मॅप च्या आधारे आपली चांद्रयान मोहीम यशस्वीरीत्या राबविता येऊ शकते,असेही तुपे यांनी सांगितले.