नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
मुख्तार अब्बास नक्वी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेस लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात रविवारी (5 जानेवारी) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाकडून सुरू असलेल्या 'जनसंपर्क' मोहिमेअंतर्गत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमात नक्वी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
'काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबबाबत संसदेत आणि संसदेबाहेर वेगवेगळी मते आहेत. संसदेत ते पाठिंबा व्यक्त करतात तर रस्त्यावर मात्र विरोध करतात. असे करून ते जनतेत भीती आणि संभ्रम निर्माण करत आहेत' असं मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची बाजू मांडताना काँग्रेसला टोला लगावला होता. हिंदू भारतात येणार नाहीत तर कुठे जाणार?, इटली त्यांना घेणार आहे का? असं भाजपाच्या जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं होतं. 'हिंदू जर भारतात येणार नाहीत, तर ते कुठे जाणार? इटली त्यांना थोडीच नागरिकत्व देणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे आणि त्यांचं संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी आहे' असं रेड्डी यांनी म्हटलं होतं.
दिल्लीमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उफाळलेल्या हिंसाचारावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाने या हिंसाचारासाठी काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारास काँग्रेस व आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला. बुधवारी (1 जानेवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जावडेकरांनी आप आणि काँग्रेसवर टीका केली होती. 'दिल्लीसारख्या शांततामय शहरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आले व येथील संपत्तीचे नुकसान झाले आहे. काँग्रेस व आम आदमी पक्ष यासाठी जबाबदार आहे. त्यांनी जनतेची माफी मागायला हवी' असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
जेएनयूतील हिंसाचाराचा मुंबईतही नोंदवला निषेध
केंद्राकडे ४५,०७७ कोटी थकले; राज्याच्या बजेटला लागणार कात्री
मनसे स्वीकारणार शिवरायांची राजमुद्रा, पक्षाचा झेंडा बदलण्याची चर्चा