अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती दोन वर्षांनी जिवंत घरी! मध्य प्रदेशातील अजब घटना; नातेवाइकांना आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:13 AM2023-04-17T06:13:35+5:302023-04-17T06:14:12+5:30
Jara Hatke News: : कोरोनाने मरण पावल्याने मृतदेहावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले आहे. अंत्यसंस्काराच्या घटनेनंतर ही व्यक्ती दोन वर्षांनी घरी परत आली आहे.
धार : कोरोनाने मरण पावल्याने मृतदेहावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले आहे. अंत्यसंस्काराच्या घटनेनंतर ही व्यक्ती दोन वर्षांनी घरी परत आली आहे. कमलेश पाटीदार (वय ३५ ) असे त्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडलेला हा अजब प्रकार सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मध्य प्रदेशातील करोदकला गावामध्ये शनिवारी सकाळी सहा वाजता कमलेशने आपल्या मावशीच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्याला जिवंत पाहून सर्वांनाच धक्का बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराचा संसर्ग झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाने हवाली केलेल्या कमलेशच्या पार्थिवावर नातेवाइकांनी अंतिम संस्कारही केले होते. ही माहिती कमलेशचा चुलत भाऊ मुकेश पाटीदार याने पत्रकारांना दिली.
मृत घोषित केलेला कमलेश प्रत्यक्षात जिवंत आहे हे पाहून नातेवाईक आनंदित झाले. मात्र, गेल्या दोन वर्षांत तो कुठे राहत होता याबद्दल कमलेशने मौन बाळगले आहे. यासंदर्भात कानवन पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकारी रामसिंह राठोड यांनी सांगितले की, कमलेश पाटीदारला २०२१ मध्ये कोरोना झाल्याने वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांकडून पोलिसांना मिळाली. रुग्णालयाने कमलेशचा म्हणून दिलेल्या मृतदेहाची नातेवाइकांनीही ओळख पटविली होती. (वृत्तसंस्था)
दोन वर्षांबद्दल कमलेशने बाळगले मौन
- मृत घोषित झालेल्या पण प्रत्यक्षात जिवंत असलेला कमलेश पाटीदार हा गेल्या दोन वर्षांपासून कुठे राहायला होता, या काळात तो काय करत होता याबद्दल पोलिस चौकशी करणार आहेत. घरी परत आलेल्या कमलेशची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे.
- कमलेशचा म्हणून जो मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या हवाली करण्यात आला तो नेमका कुणाचा होता, असाही सवाल आता विचारला जात आहे. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठा गोंधळ घालून ठेवला असावा, असेही म्हटले जात आहे.