ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दोन्ही देशाच्या मीडियामध्ये व्दिपक्षीय मालिकेची चर्चा सुरु झाली आहे. पण भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेट मालिकेची शक्यता फेटाळून लावली आहे.
क्रिकेट आणि दहशतवाद एकचवेळी चालू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. येत्या चार जूनला इंग्लंडमध्ये एजबेस्टॉनवर दोन्ही देशांमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे पदाधिकारी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी दुबईत भेटून दोन्ही देशात क्रिकेट मालिका खेळवण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. मात्र त्याआधीच गोएल यांनी स्पष्ट संदेश दिला आहे.
आयसीसीच्या कार्यक्रमानुसार यावर्षाच्या अखेरीस भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव आहे. पण सध्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारचे वातावरण आहे त्यामुळे अशी मालिका शक्य नाही. पाकिस्तान बरोबर कुठल्याही मालिकेचा प्रस्ताव देण्याआधी बीसीसीआयने सरकारशी चर्चा करावी, सद्य परिस्थितीत पाकिस्तानबरोबर कुठलीही मालिका शक्य नाही असे विजय गोएल यांनी स्पष्ट केले.