आज तो दिवस आला आहे, ज्याची क्रिकेटप्रेमी जवळपास महिनाभरापासून वाट पाहत होते. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. भारताच्या विजयासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. नेते असोत की कलाकार, प्रत्येकजण आपापल्या परीने टीम इंडियाला शुभेच्छा देत आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही व्हिडिओ संदेश जारी करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसने सोनिया गांधी यांचा एक व्हिडिओ संदेश एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केला आहे. "विश्वचषकातील तुमच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि उत्कृष्ट टीमवर्कबद्दल मी तुमचे अभिनंदन करून सुरुवात करू इच्छिते. तुम्ही सातत्याने देशाला गौरव आणि आम्हाला एकत्रितपणे आनंद साजरे करण्याचे क्षण मिळवून दिले आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंतच्या तुमच्या प्रवासाने एकता, मेहनत आणि दृढनिश्चयाचा संदेश दिला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी टीम इंडियाचे अभिनंदन करू इच्छितो", असे सोनिया म्हणाल्या.
याचबरोबर, सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, "आज मला १९८३ आणि २०११ मधील ते दोन प्रसंग आठवत आहेत, जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला होता आणि संपूर्ण देशाने आनंद साजरा केला होता. ही संधी पुन्हा चालून आली आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्याने नेहमीच देशाला जोडण्याचे काम केले आहे. आज अंतिम सामना असून संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. टीम इंडियाच्या यशासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. जगज्जेता होण्यासाठी जगज्जेत्यामध्ये जे गुण असले पाहिजेत ते सर्व गुण तुमच्यात आहेत. आज फक्त टीम इंडियाच जिंकेल", अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी टीम इंडियाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.