पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता अफवा पसरायलाही सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर हरभजन सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी एक बातमी समोर आली होती. मात्र, हरभजनने या वृत्तांचे खंडन करत, ती 'फेक न्यूज' असल्याचे म्हटले आहे. (Harbhajan Singh Joins BJP?)
खरे तर, एका मीडिया आउटलेटने सूत्रांचा हवाला देत, पंजाब निवडणुकीपूर्वी हरभजन सिंग आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना ही फेक न्यूज असल्याचे हरभजनने म्हटले आहे. मात्र, अद्याप युवराजच्या बाजूने यावर कसल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलेले नाही.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजन सिंग पुढील आठवड्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. यानंतर तो राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचा अंदाज लावला जात होता. तीन वर्षांपूर्वी एक मुलाखतीत हरभजन सिंग म्हणाला होता की, त्याला एखाद्या पक्षाने ऑफर केले, तर तो राजकारणात नक्की जाईल. कारण पंजापमधील लोकांसाठी त्याची काही तरी करण्याची इच्छा आहे.
गेल्या निवडणुकीवेळीही पसरली होती अफवा - हरभजन सिंग एखाद्या पक्षात जाऊ शकतो, अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी, तो काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे वृत्त आले होते. तेव्हाही त्याने हे वृत्त फेटाळून लावले होते. तेव्हा, हरभजन काँग्रेसमध्ये जाऊ शकतो आणि त्याला जालंधरमधून उमेदवार मिळू शकते, असे म्हटले गेले होते.