Cricketers Support Wrestlers: भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंगच्या अटकेच्या मागणीवर ठाम असलेल्या कुस्तीपटूंना आता दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळाला आहे. सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे.
आंदोलक कुस्तीपटूंनी मंगळवारी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्व कुस्तीपटू हरिद्वारलाही पोहोचले होते, पण शेतकरी नेते नरेश तिकैट यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी पदकं नदीत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यांच्या समर्थनार्थ आता दिग्गज क्रिकेटर्स आले आहेत. सुनील गावस्कर-कपिल देवसह दिग्गज क्रिकेटपटूंनी पैलवानांना कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, असा सल्लाही दिला आहे.
काय म्हणाले क्रिकेटर्स...?
कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ निवेदन देताना 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने म्हटले की, भारताच्या चॅम्पियन कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीमुळे आम्ही खूप दुखी आहोत. आमचं मन सुन्न झालंय. यातच आता कुस्तीपटू आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेत आहेत, त्यामुळे जास्त काळजी वाटते. अनेक वर्षांची मेहनत, त्याग आणि संयमाने कुस्तीपटूंनी ही पदके मिळवली आहेत. ही देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अशाप्रकारचे निर्णय घाईघाईने घेऊ नयेत. यातून लवकरच काहीतरी तोडगा निघेल, असे दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.
ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या ठाम बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांसारखे दिग्गज कुस्तीपटू अनेक दिवसांपासून माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 2 एफआयआर नोंदवल्या आहेत. प्रौढ कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून एक आणि अल्पवयीन कुस्तीपटूंच्या तक्रारीवरुन एक एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पण, अद्याप ब्रिजभूषण यांना अटक किंवा पुढील कोणतीच कारवाई झाली नाही. यावरुन देशभरात संतापाची लाट आहे.