दिल्लीतील द्वारका येथे शनिवारी संध्याकाळी तीन गोळ्या झाडून एका वकिलाची हत्या करण्यात आली. त्याबरोबरच तीन दशकांपासून सुरू असलेल्या दुश्मनीचा बदला घेतला गेला. हे वैर प्रदीप आणि वीरेंद्रच्या कुटुंबांमध्ये होते. त्याचा पाया सुमारे ३६ वर्षांपूर्वी घातला गेला होता. तेव्हा १९८७ मध्ये वीरेंद्रच्या आजोबांनी आरोपी प्रदीप याच्या काकाची हत्या केली होती. शनिवारी संध्यांकाळी झालेल्या वकिलाच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हींमधून मागोवा घेतला. तेव्हा आरोपींची ओळख प्रदीप आणि नरेश अशी पटली. दोन्ही आरोपी हे सन्नोट गावातील रहिवासी होते. परस्परातील शत्रुत्वामधून प्रदीप वर्मा याने २०१७ मध्येही वकील वीरेंद्र याच्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये वीरेंद्र वाचला होता. मात्र त्याचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला होता.
त्यानंतर वकील वीरेंद्र कुमार यांना दिल्ली पोलिसांकडीन पीएसओ मिळाला होता. मात्र कोरोनाकाळात त्यांची सुरक्षा हटवण्यात आली होती. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्हीमध्ये दोघेही आरोपी दुचाकीवर स्वार होऊन वीरेंद्रचा पाठलाग करताना दिसत आहेत. तसेच संधी मिळताच त्यांनी वीरेंद्रवर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या.
पोलीस ही हत्या प्रॉपर्टीच्या वादातून करण्यात आल्याचे सांगत आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादाची सुरुवात १९८७ मध्ये झाली होती. तेव्हा वीरेंद्रचे आजोबा रामस्वरूप यांनी प्रदीपच्या काकाची हत्या केली होती. त्यावेळी प्रदीपचं वय केवळ दोन वर्षे एवढं होतं. मात्र त्यानंतर वीरेंद्रच्या आजोबांनी प्रदीपच्या आजोबांचीही हत्या केली होती.
काळासोबत प्रदीप जसजसा मोठा झाला. तसतस बदला घेण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. त्यासाठी त्याने पैलवानी सुरू केली. यादरम्यान, प्रदीपच्या कुटुंबाला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेला वीरेंद्रने कायदेशीर पेचात अडकवले. त्यामुळे प्रदीपची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि हत्या झालेला हे दोघेही दिल्लीतील सन्नोट गावातील रहिवासी आहेत. ओळख पटल्यानंतर आता लवकरात लवकर पोलीस त्या दोघांनाही अटक करतील. मात्र तीन दशके जुन्या वादाची अखेर एवढ्या भयानक पद्धतीने होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.